माळढोक पक्ष्याच्या मराठी नावातच त्याच्या निवासचं ठिकाण समावलंय. माळरानावर रहाणारा हा मोठा पक्षी खरंतर माळरानाची शान म्हणावा असाच आहे. ’ओटिडिडाइ’ कुटुंबातल्या (Otididae) ह्या सदस्याला आपल्यामुळेच आज नामशेष व्हायची वेळ आली आहे. मोकळ्या रानमाळ, गवताळ जमिनी आणि साधारण शेतीच्या सान्निध्यात रहाणारे हे पक्षी गिधाडांपेक्षा थोडे मोठे असतात. साधारण लहान शहामृगाच्या आकाराएवढा हा पक्षी असतो
त्यातच, निसर्गाचा वरदहस्त असलेल्या महाराष्ट्रात केवळ सहा माळढोक पक्षी उरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधीच जगातील अतिदुर्मिळ प्रजातींमध्ये गणल्या जाणारी माळढोक प्रजाती आता राज्यातून नामशेष होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोलापुरातील माळढोक पक्षी अभयारण्यात केवळ चार तर, अहमदनगर येथे दोन माळढोक पक्षी असल्याचा अंदाज बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा परिसरात माळढोक पक्ष्यांची संख्या ३ किंवा ४ असावी, तर सोलापुरातील नान्नज येथील माळढोक अभयारण्यात ही संख्या २ किंवा ३ असावी. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील परिस्थिती पाहता येथील माळढोक पक्ष्यांची संख्या ४ किंवा ५ असावी असा अंदाज व्यक्त करून गुजरातमध्ये स्थिती थोडी बरी असून, तिथे अवघे १५ माळढोक पक्षी उरल्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशातून मात्र माळढोक पक्षी नामशेष झाला आहे. गवताळ प्रदेश हा माळढोक या पक्ष्याचा नैसर्गिक अधिवास असून तोच नाहीसा झाल्याने या देखण्या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत पुरेशी जनजागृती केली जात नसल्याने माळढोक पक्षी दिवसागणिक कमी होत आहेत. एकेकाळी या पक्ष्यांच्या प्रेमात पडलेल्या ब्रिटिश अधिकार्यांनी मोठ्या प्रमाणात शिकार केल्याने माळढोक पक्ष्यांची संख्या घटली. स्वातंत्र्य काळानंतरही या पक्ष्याचे मांस रुचकर लागते असा गैरसमज असल्याने याची अतोनात शिकार होत गेली.
दरम्यान, राजस्थानात अद्यापही विविध भागांत माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व दिसून येते. ‘राजस्थान सरकारच्या पुढाकाराने सुरू असलेल्या ‘सेव्ह बस्टर्ड’ या प्रकल्पामुळे आशा पल्लवीत झाल्या असून, या प्रकल्पात माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनांवर वनविभागाकडून समाधानकारक लक्ष ठेवले जात आहे. या प्रकल्पांतर्गत गवताळ प्रदेशाचे संवर्धन, लोकसहभागातून जनजागृती आणि माळढोक पक्ष्याची नित्यनेमाने मोजणी सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत वनविभागालाही सरकारकडून प्रेरणा मिळत असून अशा प्रकारचा प्रकल्प महाराष्ट्रातही राबवला जावा,’ अशी इच्छा विविध निसर्गप्रेमींनी व विविध संघटनांनी व्यक्त केली आहे.
माळढोक पक्ष्यांची घटती संख्या हा आता गंभीर विषय झाला असून, यापुढे त्यांच्या संरक्षणाबरोबरच संवर्धनासाठी कृत्रिम प्रजनन पद्धती स्वीकारावी लागेल. त्याशिवाय माळढोक वाचणार नाहीत. परदेशातही कृत्रिम पद्धतीने प्रजनन करून माळढोकांची संख्या वाढविण्यात यश आले आहे.
कायदा (Law)- वन्यजीव (संरक्षण) अधिनियम कायद्यानुसार माळढोक या पक्ष्याचा अनुसुची १ मध्ये समावेश करण्यात आला आहे. या पक्ष्यास पकडणाऱ्या, मारणाऱ्या वा त्यांचा अधिवास नष्ट करणाऱ्या व्यक्तीस ३ ते ५ वर्ष कारावास व २५००० रुपये दंड होऊ शकतो. तसेच या पक्ष्यांची वा त्यांच्या अवयवाची विक्री वा तस्करी करणाऱ्यास ५ ते ७ वर्ष कारावास व ३०००० रुपये दंड होऊ शकतो. तरी असे काही गैरप्रकार होत असल्याची कोणाला काहि खात्रीशीर माहिती असल्यास त्वरीत वनविभागाशी संपर्क साधावा हि विनंती. वनपरीक्षेत्र पुणे. फोन- ०२०२४४७२९८९.
No comments:
Post a Comment