सरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या ऑफीडिया उपगणात सापांचा समावेश होतो. ते सरपटणारे, शरीरावर खवले असणारे, पाय नसलेले, अनियततापी व कवचयुक्त अंडज, तर काही जरायुज प्राणी आहेत.
सापांच्या सु. २,५०० जाती असून भारतात ३४० जाती आढळतात. त्यांपैकी फक्त ६९ जातींचे सापविषारी आहेत. महाराष्ट्रात सापांच्या सु. ५२ जाती असून त्यांपैकी १२ जाती विषारी आहेत. साप प्रामुख्याने उबदार हवामानात आणि गवताळ व सुपीक प्रदेशांत आढळतात. साप जमिनीवर तसेच पाण्यातही आढळतात. समुद्रात आढळणारे सर्व साप विषारी, तर गोड्या पाण्यातील सर्व साप बिनविषारी असतात. न्यूझीलंड, आयर्लंड व बर्म्यूडा या प्रदेशांत साप आढळत नाहीत. प्वेर्त रीको, क्यूबा, हैती, हवाई, जमेका, मादागास्कर इ. प्रदेशांत विषारी साप आढळत नाहीत.
सापांच्या जीवाश्मांच्या (शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) अभ्यासात त्यांचे १० कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म आढळले आहेत. मानवनिर्मितीच्या अगोदरपासूनच साप पृथ्वीवर अस्तित्वात होते. सरीसृपांच्या क्रम-विकासात (उत्क्रांतीत) प्रथम सरडे व त्यानंतर साप निर्माण झाले. पूर्वी सापांना लहान पाय होते; परंतु साप बिळात राहत असल्याने त्यांना पायांचा अडथळा होऊ लागला व क्रमविकासात पाय अनावश्यक ठरल्याने हळूहळू सापांचे पाय नष्ट झाले.
अधिवास
साप सर्व प्रकारच्या अधिवासांत आढळतात. गोड्या तसेच समुद्राच्या पाण्यात, गवताळ व खडकाळ प्रदेशांत, दलदली जवळ व पर्वतावर सापांचे वास्तव्य असते. उष्णकटिबंधातील जंगलात ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. वाळवंटात राहणाऱ्या या सापांच्या अंगावरील खवल्यांना बारीक उंचवटे असतात, त्यामुळे वाळूवरून सरपटताना त्यांना पकड मिळते. या सापांच्या डोक्यावरील भागास उंचवटे असल्याने त्यांना वाळूत पुरून घेण्यास मदत होते. रेड स्पॉटेड स्नेक व रजतवंशी (रॉयल स्नेक) हे वाळवंटात राहणारे साप आहेत.
काही साप झाडावर राहतात. या सापांचे वास्तव्य फांद्यांवर, झुडपांत व झाडांच्या ढोलीत असते. त्यांची शेपटी लांब असल्याने वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर येताना ते वरच्या फांदीस वेटोळे टाकून आपल्या शरीराचा पूर्ण भार पेलू शकतात; उदा., वाईन स्नेक, उडता सोनसर्प (फ्लाईंग स्नेक). नद्या, तळी व नाले यांच्या आसपास आढळणाऱ्या या सापांना पाणसर्प म्हणतात. या सापांची नासाद्वारे डोक्याच्या वरील बाजूस असतात. त्यांना श्वसनासाठी पूर्ण डोके पाण्याबाहेर काढण्याची गरज भासत नाही. उदा., विरोळा, पट्टेरी पाणसाप, पाणदिवड इत्यादी.
साप कायम एकाच प्रकारच्या अधिवासात राहत नाहीत. पाणसर्प जमिनीवर किंवा जमिनीवरील साप पाण्यात आढळू शकतात. साप जमिनीवर बिळात राहतात; परंतु ते स्वतः बिळे तयार करत नाहीत. मुंग्यांच्या वारूळात किंवा उंदीर व इतर प्राण्यांनी तयार केलेल्या बिळात ते राहतात.
जगात सर्वांत लांब असणारा बिनविषारी साप पायथॉन रेटिक्युलेटस [ ⟶ अजगर] हा असून त्याची लांबी ११–११·५ मी. असते. ⇨ ॲनॅकाँडा याची लांबी सु.९ मी. व वजन सु. ५०० किग्रॅ. असते. बिनविषारी सापांमध्ये सर्वांत लहान ⇨आंधळा साप (ब्लाइंड स्नेक) हा असून त्याची लांबी सु. १० सेंमी. असते. ⇨नागराज (किंग कोब्रा) हा विषारी सापांतील मोठा साप असून त्याची लांबी ४·५–५·४ मी. असते. वजनाने मोठा व विषारी साप ईस्टर्न डायमंडबॅक रॅटलस्नेक हा असून त्याची लांबी २-३ मी. व वजन सु. १५·५ किग्रॅ. असते. विषारी सापांमध्ये सर्वां लहान साप स्लाईड स्नेक (वार्म स्नेक) हा आहे.
हालचाल
साप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरपटत जातो. तो सरपटताना तोंडापासून शेपटीपर्यंत संपूर्ण शरीराचा वापर करतो. त्याच्या शरीरात १००–३०० मणके (कशेरुक) असतात. प्रत्येक मणक्यास दोन बरगड्या जोडलेल्या असतात. त्यामुळे त्याचे शरीर लवचिक व सहज वळण्यासारखे बनते. शरीर जमिनीला सपाट ठेवून त्याच्या शरीराला ‘S’ आकाराची अनेक वळणे तयार होतात. तो खडक व जमीन अशा कठिण भागांवर दाब देऊन सरपटत पुढे सरकत असतो.
अजगर व घोणस यांसारखे वजनाने जड साप सरळ रेषेत सरपटत पुढे जातात. त्यांचे पोटाखालचे अधर शल्क पृष्ठभागामध्ये घट्ट रोवतात व त्वचेच्या आतील शरीर स्नायूंसह पुढे सरकते. अधर शल्काची पकड ढिली होते. तेव्हा ते पुढे सरकतात व पुन्हा पृष्ठभागात घट्ट पकड घेतात. या पद्घतीत सर्व शरीर जमिनीला घासत असल्याने या सापाचा वेग मंद असतो. रेताड प्रदेशातील सापाची वक्रगती (वेलांटी) चाल असते. ज्या दिशेला त्याला पुढे जायचे त्या दिशेच्या काटकोनात तो शरीर सरकवितो. पुढे सरकताना साप डोके व मान जमिनीपासून वर उचलून त्या दिशेच्या बाजूस फेकतो; जमिनीवर प्रथम मान व नंतर शेपटी टेकते. शेपटी जमिनीवर टेकल्यावर पुन्हा डोके व मान उचलून त्या दिशेच्या बाजूस फेकतो. कोकणात आढळणारा फुरसे हा साप या पद्घतीने हालचाल करतो.
सगळेच साप पाण्यात पोहू शकतात; परंतु पाण्यात दीर्घकाळ पोहण्याची व राहण्याची क्षमता फक्त पाणसर्प या सापामध्ये आहे

No comments:
Post a Comment